सोशल मिडियावर मैत्रिणी सोबतचे व्हिडिओ वायरल करण्याची दिली धमकी
पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
मैत्रिणीबरोबरचे ‘ते व्हिडिओ, फोटो घरच्यांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन ४२ वर्षीय तरुणाला ब्लॅकमेल करणार्या मिथुन गायकवाड याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
मिथुन मोहन गायकवाड (वय २९, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केली असून, त्याचा साथीदार करण खुडे (रा. लोणंद, नातेपुते, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कर्वेनगरमधील एका ४२ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांचा बिल्डिंग मटेरियल पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना २० मे रोजी एक फोन आला. त्यावरुन बोलणार्याने तुझे व तुझ्या मैत्रिणीचे फोटो व व्हीडिओ आमच्याकडे आहेत. ते घरांच्याना पाठवितो तसेच सोशल मिडियावर व्हायरल करुन समाजात तुझी बदनामी करतो, अशी भीती घातली. ते करु नये, म्हणून त्याच्याकडे १५ लाख रुपयांची खंडणी मागितली.
भीतीपोटी फिर्यादीने आतापर्यंत २ लाख ६० हजार रुपये त्यांना दिले. त्यासाठी त्याने आपले वडिलांची कारही विकली. तरीही त्यांचे धमकी देणे थांबत नव्हते. शेवटी त्यांनी खंडणी विरोधी पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली.
पोलिसांच्या सांगण्यावरुन फिर्यादीने त्यांना आणखी १ लाख रुपये देण्यासाठी तयारी दर्शविली. पैसे घेण्यासाठी दगडुशेठ गणपती मंदिराजवळील आईस्क्रीम पार्लरसमोर शुक्रवारी बोलावले. फिर्यादीकडून १ लाख रुपये घेताना मिथुन गायकवाड याला पोलिसांनी सापळा रचून पकडले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा पुढील तपास करीत आहेत.

 
			

















