पुण्यातील दुर्दैवी घटना : वारजे पोलीस स्टेशनमध्ये चालकाविरुद्ध फिर्याद दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये नात आणि आजी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात पुण्यातील नवले ब्रीजवर सोमवारी (दि.13) रात्री पावणे दहाच्या सुमारास झाला होता.
मीना राजेंद्र वाघमारे (वय- 45 रा. कोळेवाडी, कोथरुड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अपघातामध्ये सई वाघमारे ही जखमी झाली आहे. याप्रकरणी राजेंद्र वाघमारे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाघमारे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र आणि त्यांची पत्नी मीना व नात सई सोमवारी (दि.13) दुचाकीवरून घराकडे चालले होते.
त्यावेळी वारजे ब्रीजवर भरधाव वेगात आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरची धडक त्यांच्या दुचाकीला बसली. या धडकेत तिघेही खाली पडले. त्यामुळे मीना आणि सई जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मीना यांच्यावर उपचार सुरु असताना उपचारादरम्यान यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पारवे करीत आहेत.
