बारामतीमधील अंजनगावातील प्रकार : सुदैवाने एक मुलगी वाचली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बारामती : अंजनगाव (ता. बारामती, जि. पुणे) येथे पिण्यासाठी पाणी काढत असताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने माय-लेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर, पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने वाचली आहे. ही घटना मंगळवारी (14 सप्टेंबर) रोजी घडली.
अश्विनी सुरेश लावंड (वय, 36) समृद्धी सुरेश लावंड (वय,15) अशी मृत झालेल्या मायलेंकीची नावे आहेत. तसेच श्रावणी सुरेश लावंड (वय,12) ही घटनेतुन बचावलेल्या मुलीचं नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, अश्विनी या आपल्या 2 मुलींसह शेतात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. तिघींना तहान लागल्यानंतर गट नंबर 90 मधील मेमाणे यांच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या शेततळ्यात पाणी काढण्यासाठी बाटली घेवून उतरल्या होत्या. यावेळी समृद्धी शेततळ्यात बाटलीत पाणी भरताना पाय घसरुन पडली.
मुलीला वाचवण्यासाठी आई (अश्विनी) यांनी प्रयत्न केला असता, त्यांचाही पाय घसरला आणि दोघीही पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणीही पाण्यात पडली. तिघीही पाण्यात बुडाल्या. पण, श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने तेथील स्थानिकांच्या लक्षात आलं. तत्पुर्वी अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
दरम्यान, या घटनेबाबत माहिती समजताच पोलिस पाटील ईश्वर खोमणे आणि पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. सुभाष परकाळे, सुभाष वायसे या युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
