आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : कौस्तुभ मराठे व मंजिरी मराठे पोलिसांच्या ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत मराठे ज्वेलर्सचे कौस्तुभ मराठे व मंजिरी मराठे यांना फसवणूक व अपहार प्रकरणी अटक केली आहे. त्यांच्यावर आतापर्यंत ५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
पुणे शहरातील मराठे ज्वेलर्स व प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा.लि.च्या भागीदार व संचालक यांनी सोने, चांदी, हिरे विक्रीचे व्यापारी म्हणून काम करीत असताना धंद्याच्या ओघात गुतंवणुकदारांकडून पैसे व सोन्याच्या स्वरूपात ठेवी स्वीकारून त्यांच्या ठेवीवर व्याज देण्याचे कबूल करून काही कालावधीकरिता व्याज देऊन गुतंवणुकदारांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर जमा केलेल्या ठेवींवर व्याज व मुदतपूर्तीनंतर मुद्दल ठेवी हेतुपुरस्सर परत न करता फौजदारीपात्र न्यासभंग करून तसेच गुंतवणुकदारांच्या ठेवींचे हितसंबंधाचे संरक्षण न करता व त्या रकमेचा अपहार करून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मिलिंद मराठे, कौस्तुभ मराठे, नीना मराठे, मंजिरी मराठे, प्रणव मराठे व इतर यांच्या विरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात कलम ४०६, ४२०,४०९, ३४ भादवि आणि महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध कायदा कलम तीनप्रमाणे मार्च २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मंजिरी मराठे यांना मा सुप्रीम कोर्टाने मुदतीमध्ये सत्र न्यायालय, पुणे येथे हजर होण्याबाबत आदेश दिल्यानंतर १३ सप्टेंबर रोजी त्या व कौस्तुभ मराठे हे दोघे सत्र न्यायालयात हजर झाले. त्यानंतर या गुन्ह्यात त्यांना तपासकामी अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील इतर आरोपींपैकी प्रणव मराठे (वय २६) यास यापूर्वी अटक करण्यात आली असून, तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. आतापर्यंत ५ कोटी ९ लाख ७२ हजार ९७० रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. सध्या कौस्तुभ मराठे व मंजिरी मराठे यांची पोलिस कस्टडीमध्ये सखोल चौकशी सुरू आहे. यातील गुंतवणुकदारांच्या ठेवींची आरोपीतांनी कशाप्रकारे विल्हेवाट लावली आहे, याबाबत पोलिस त्यांच्याकडे कसून तपास करीत आहेत.
सदर गुन्ह्यामध्ये पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त रवींद्र शिसवे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलम भगत, सहायक पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, फौजदार तावरे, हवालदार मोहरे, झगडे, शिपाई कांबळे, मोरे हे पथक करीत आहे.
पोलिसांकडून आवाहन
अशा प्रकारे आमिषाला बळी पडून मराठे ज्वेलर्स व प्रणव मराठे ज्वेलर्स प्रा.लि. मध्ये ठेवी जमा केल्यानंतर फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा पोलिस आयुक्त कार्यालय, पुणे शहर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.















