मुंढवा पोलिसांनी केले दोघांना जेरबंद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमसंबंधातून दोन वर्षापूर्वी जन्म दिलेल्या मुलाचे बरेवाईट केल्याचा संशय तरुणीने व्यक्त केला असून, मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शुभम महेश भांडे (वय २३, रा. वडगाव शेरी) आणि योगेश सुरेश काळे (वय २६, रा. मारुती निवास, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट रोड, मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणार्या एका २५ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. दरम्यान, या दोघांनी या मुलाचे नेमके काय केले हे सांगत नसून त्याचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी सांगितले की, तरुणी आणि शुभम भांडे यांचे प्रेमसंबंध होते. त्यातून ही फिर्यादी तरुणी गर्भवती राहिली. तिने १४ मार्च २०१९ रोजी एका बाळाला मुंढवा येथील केशवनगरमधील एका घरात जन्म दिला.
ही गोष्ट त्यांनी इतरांपासून लपवून ठेवली. बाळाच्या जन्मानंतर भांडे आणि काळे याने १३ दिवसाच्या बाळाला २३ मार्च २०१९ रोजी
सकाळी ११ वाजता या तरुणीकडून घेतले आणि आश्रमात ठेवतो.असे सांगून घेऊन गेले. या गोष्टीला आता अडीच वर्षे झाली. भांडे आणि काळे हे खासगी नोकरी करतात. दरम्यान, ही तरुणी आणि शुभम भांडे यांचे ब्रेकअप झाले. तेव्हा तिने आपले बाळ कोठे आहे, याची विचारणा केली. मात्र, भांडे याने तिला काहीही सांगितले नाही. त्यामुळे शेवटी या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात ११ सप्टेंबर २०२१ रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्याच्या चौकशी अहवालानुसार पडताळणी करुन मुंढवा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोघांनाही अटक केली असून, तपासासाठी न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
या दोघांनी त्या १३ दिवसाच्या बाळाचे काय केले याचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे अधिक तपास करीत आहेत.
