विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील शॉपमधील प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात महिलांवर अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यातच पुण्यातील लक्ष्मी रोडवरील एका प्रसिद्ध कापड दुकानात काम मागण्यासाठी गेलेल्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कापड दुकानाबाहेर घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळु शिळीमकर (वय-45) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीचे लक्ष्मी रोडवरील कुंटे चौकात ‘तनिषा क्रिएशन’ नावाचे कापड दुकान आहे. फिर्यादी महिला कापड दुकानात कामाबाबत चौकशी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी बाळु शिळीमकरने पीडित महिलेला दुकानाबाहेर नेऊन पार्ट टाईम काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. काम मिळवून देण्यासाठी ‘तू नवऱ्यासोबत जो प्रोग्राम करते तसाच माझ्यासोबत कर’ असे म्हणत शरीरसुखाची मागणी केली.
पीडित महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध 354 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करीत आहेत.
