विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या रिलेशन भरतीसाठी बनावट जन्म दाखला सादर करुन वय लपवून भरतीसाठी पात्र होण्याचा प्रयत्न करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ जानेवारी ते १९ फेब्रुवारी २०२१ दरम्यान बी. ई. जी. सेंटर, खडकी येथे घडला आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी परसराम बलीराम डोंगरे (रा. बजाला, पो़ पुलसंगावी, ता. गेवरी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, परसराम डोंगरे हा बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या रिलेशन भरतीसाठी आला होता. त्याचे वय मुळ कागदपत्रांनुसार जास्त असल्याने ते वय लपवून भरतीस पात्र होण्यासाठी त्याने त्यांची जन्मतारीख १ ऑगस्ट १९९७ असताना त्याने रिलेशन सर्टिफिकेटवर आपली जन्मतारीख २६ डिसेंबर २००२ अशी असल्याचे नमूद असणारे खोटे सर्टिफिकेट सादर करुन भारतीय सैन्य दलाची फसवणूक केली.
पोलीस उपनिरीक्षक मगदूम तपास करीत आहेत.















