येरवडा पोलिसांची कामगिरी : चार गुन्ह्यांतील सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गाडीची काच फोडून म्युझिक सिस्टम चोरणाऱ्यास अटक करण्यात येरवडा पोलिसांना यश मिळाले असून, त्याच्याकडून चार गुन्ह्यांतील सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी रात्रौ क्षेत्रीय कार्यालय येरवडा पुणे येथे फोर व्हिलर गाडीची काच फोडून गाडीतील म्युझिक सिस्टम कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केले म्हणून येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डॉन बॉस्को शाळेच्या मागील सार्वजनिक रोडलगत पांढऱ्या रंगांच्या ॲक्सेस गाडीसह एक इसम म्युझिक सिस्टिम विक्रीकरिता थांबलेला आहे. असे समजल्याने लागलीच येरवडा तपासपथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यास पळून जात असताना पकडले.
इरफान खालीद सय्यद (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे त्याचे नाव असून, त्यांच्या ताब्यातील ॲक्सेस मोपेड गाडीची झडती घेतली असता सदर गाडीच्या डिक्कीत एक काळ्या रंगाची डीएचसी कंपनीची ॲन्ड्रॉईड कार म्युझिक सिस्टिम आणि एक लोखंडी काळ्या रंगाची ॲडजेस्टेबल पक्कड असे मिळून आल्याने त्याबाबत त्यास विचारले असता त्याने सदरची म्युझिक सिस्टिम चोरल्याचे कबूल केले आहे.
आरोपीस सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पोलीस कस्टडी दरम्यान अधिक तपास करता त्याने याच प्रकारचे आणखी तीन गुन्हे केल्याचे कबूल केल्याने एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर चार गुन्ह्यातील दोन वुप्पर, एक ऍल्पीफायर, एक ॲन्ड्रॉईड कार म्युझिक सिस्टम, दोन स्क्रिन टेप, एक रुफ स्क्रीन, एक टू व्हिलर असा एकूण १,१७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरीही, पोलीस उप-आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहपोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर, खटके, फौजदार प्रदीप सुर्वे, हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, पोलीस नाईक तुषार खराडे, अमजद शेख, गणेश वाघ, किरण घुटे, सचिन माळी, पोलीस शिपाई गणेश शिंदे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, अजित वाघुले, स्वप्नील मराठे यांनी केलेली आहे.
















