चौघांसह १२-१३ साथीदारांवर गुन्हा : हवेत तलवार फिरवत परिसरात दहशत निर्माण केली
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवड्यातील प्रतिकनगरकडून बाबा हुसेनशहा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या १४ गाड्यांची तलवार, रॉड, कोयता व पालघनसारख्या हत्याराने तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर फिर्यादीच्या अंगावर तलवार उगारत हवेत फिरवत परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडून दहशत निर्माण केली. याप्रकरणी चौघांसह त्यांच्या १२-१४ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल सैय्यद (वय ५१, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली असून, येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांचे चुलतभाऊ नवाज सैय्यद यांच्या हुसेनशहा मिनी स्टॉलमध्ये बसले होते. त्यावेळी चौघा आरोपींसह त्यांच्या १२-१३ साथीदारांनी दहशत माजविण्याच्या उद्देशाने प्रतिकनगरकडून बाबा हुसेनशहा नगरकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला उभ्या केलेल्या १४ गाड्यांची तलवार, रॉड, कोयता व पालघनसारख्या हत्याराने तोडफोड करून नुकसान केले. त्यानंतर फिर्यादीच्या अंगावर तलवार उगारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी हत्यारे हवेत फिरवत दुकानदारांना धंदा बंद करण्यास भाग पाडून परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. ए. खटके करीत आहेत.
