अँन्टी करप्शनची कारवाई : मुकादम फरार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : किटक विभागात बदली न करण्यासाठी बिगारी पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून 10 हजाराची लाच स्विकारताना पुणे महानगरपालिकेतील मुकादम आणि कचरा गाडीवरील (झाडुवाला) कर्मचाऱ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (दि.02) सापळा रचून रंगेहाथ पकडले. एसीबीने कचरा गाडीवरील कर्मचाऱ्याला अटक केली असून, मुकादम फरार झाला आहे.
कचरा गाडीवरील कर्मचारी हर्षल ज्ञानेश्वर अडागळे (वय-31) असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मुकादम रवी लोंढे हा फरार आहे. याप्रकरणी तक्रारदाराने (वय-36) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. आरोपींविरोधात खडक पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुन्ह्यातील आरोपी मुकादम रवी लोंढे हा फरार आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार हे कचरा मोटार बिगारी विभागात काम करत आहेत. त्यांची नाईट ड्युटी चालू ठेवण्यासाठी तसेच किटक विभागात बदली न करण्यासाठी मुकादम रवी लोंढे याने 15 हजाराची लाच मागितली. तडजोडीमध्ये 10 हजार लाच देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी (दि.1) पडताळणी केली असता रवी लोंढे याने लाचेची रक्कम कचरा गाडीवरील कर्मचारी हर्षल अडागळे याच्याकडे देण्यास सांगितले. एसीबीने शनिवारी सापळा रचून आरोपी हर्षल अडागळे याला तक्रारदार यांच्याकडून मुकादम रवी लोंढे याच्यासाठी 10 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.















