१२ जण अटकेत : भुकण वस्तीतील गुरुद्वारा कॉलनीत घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व जण घरात बंदिस्त झाले असताना अनेकांचे प्राणीप्रेम उफाळून आले. कुत्री, मांजरी पाळण्याचे फॅड वाढले. त्याचवेळी प्राण्यांची स्वच्छता करण्याची जबाबदारी मात्र सार्वजनिक रस्त्यांवर सोपविण्याचे प्रमाण वाढले. त्यातूनच लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीतील सार्वजनिक रोडवर दोन कुटुंबामध्ये राडा झाला. हा राडा इतका वाढला की दोन्ही कुटुंबांनी परस्पराविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारी दिल्या. विमानतळ पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील 12 जणांना अटक केली आहे. हा प्रकार भुकण वस्तीतील गुरुद्वारा कॉलनीतील सार्वजनिक रोडवर २ ऑक्टोंबरला रात्री साडेनऊ वाजता घडला.
याप्रकरणी एका 55 वर्षाच्या गृहस्थाने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या कॉलनीतील एका महिला रात्री त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना तुमच्या पाळीव कुत्र्याला संडासाकरीता बसवू नका, असे सांगितले. त्यावरुन या महिलेच्या कुटुंबातील 7 जण दुचाकीवरुन आले. त्यांनी लाकडी बांबुने फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीचे साडीला पकडून त्यांचे केसाला धरुन खाली पाडुन अश्लिल शिवीगाळ केली. विमानतळ पोलिसांनी (गु. र. नं. 319/21) 354, 324, 143,147, 149 कलमानुसार गुन्हा दाखल करुन दोन महिलांसह 7 जणांना अटक केली आहे.
24 वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या त्यांच्या पाळीव कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी तेथेच राहणार्या आरोपीने फिर्यादी यांच्या कुत्र्यास दगड मारला. फिर्यादी यांनी त्याला जाब विचारल्यावर त्याने अश्लिल शिवीगाळ करुन फिर्यादीचा हात धरुन पिरगळला. फिर्यादीची आई जाब विचारण्यासाठी गेल्या असताना सर्वानी मिळून फिर्यादी व त्यांच्या आईला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
विमानतळ पोलिसांनी (गु. र. नं. 320/21) 354, 323, 153, 147, 149, 504, 506, 427 कलमानुसार गुन्हा दाखल करुन पाच जणांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाठक अधिक तपास करीत आहेत.