नुकताच आला होता कारागृहातून बाहेर : ‘तू मोठा की मी मोठा’ यावरून झाला वाद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मद्यधुंद अवस्थेत असताना तू मोठा की मी मोठा यावरुन मित्रांमध्ये वाद झाला. त्यातून चौघांनी पार्टीसाठी पुण्यातून भोरमध्ये गेलेल्या मित्रावर बिअरची बाटली, दगड व धारदार शस्त्राने वार करुन निर्घुण खुन केला. ही घटना भोरमधील सम्राट चौकात शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. काही दिवसांपुर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तरूणाबरोबर ही घटना घडली आहे.
आनंद गणेश सांगळे (वय 23, रा.नागोबा आळी, भोर, सध्या बालाजीनगर, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सनी सुरेश बारगळे (रा. सम्राट चौक, भोर), अमीर महम्मद मणेर, समीर महम्मद मणेर (दोघे रा. नवी आळी, भोर) आणि सिद्धांत संजय बोरकर (रा. स्टेट बँकेजवळ, भोर) यांच्याविरुद्ध 302, 34 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी आनंद याची आई वर्षा गणेश सागळे (रा. नागोबा आळी, भोर) यांनी भोर पोलिसांकडे (गु. र. नं. 152/21) फिर्याद दिली आहे.
आनंद सागळे हा मुळचा भोरचा राहणारा असून सध्या तो बालाजीनगर येथे राहतो. त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. काही दिवसांपुर्वी तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.
तो शनिवारी रात्री पार्टीसाठी आला होता. सम्राट चौकात ते सर्व जण एका गाडीवर बिअर बाटल्या घेऊन पित बसले होते. बिअर पित असताना समीर मणेर याने आनंद सागळे याच्या गळ्यात हात घालून ‘तू लय मोठा झाला का’ असे म्हणाला. यावेळी त्याचा धक्का लागून एक मोटारसायकल पडली. त्यावेळी दोघांमध्ये धक्का बुक्की झाली. तेव्हा सनी बारगळे व बोरकर यांनी आनंद सागळे याला धरले व अमीर मणेर याने हातात दगड उचलून आनंदला मारहाण केली. तसेच बिअरच्या बाटल्यांनी व धारदार शस्त्राने सागळे याच्या डोक्यात, चेहर्यावर, तोंडावर वार करुन त्याचा खुन केला. या घटनेनंतर चौघेही पळून गेले असून, पोलीस निरीक्षक दबडे तपास करीत आहेत.