मोबाईलवरून राहुल शर्माला घेतले ताब्यात : पुढील तपासासाठी कोरेगाव पोलिसांच्या दिले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बँका, मोबाईल कंपन्यांकडून सातत्याने सायबर चोरट्यांविषयी सावधान करणारे मेसेज केले जात असतात. असे असतानाही अनेक जण अगदी सहजपणे या सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचे आढळून येत आहे. आलेल्या मेसेजवर संपर्क साधून त्याने सांगितल्याप्रमाणे बँक डिटेल दिल्याने एका महिलेला सायबर चोरट्यांनी तब्बल 7 लाख 32 हजार रुपयांना गंडा घातला.
याप्रकरणी बंडगार्डनमधील मंगलदास रोडवर राहणार्या एका ३८ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिसांकडे (गु. र. नं. 144/21) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांना आयडीया सीमकार्ड अपडेट करण्यासाठी एक मेसेज आला होता. त्या मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर फिर्यादी यांनी 30 जुलै रोजी संपर्क साधला.
फोन घेणार्याने त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना केवायसी केले नाही तर सीमकार्ड बंद होईल, असे सांगून त्यांना एक लिंक पाठविली. त्यामध्ये बँकेची माहिती भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून या महिलेने सर्व माहिती भरली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातील 7 लाख 32 हजार रुपये सायबर चोरट्यांनी काढून घेऊन फसवणूक केली.
याप्रकरणी त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सायबर पोलिसांनी हा प्रकार राहुल शर्मा नावाच्या मोबाईलधारकाच्या मोबाईलवरुन करण्यात आल्याचे उघडकीस आणला आहे. पुढील कारवाईसाठी हा गुन्हा कोरेगाव पार्क पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे. पोलीस निरीक्षक भुजबळ तपास करीत आहेत.
