गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी : सहा जणांना ताब्यात घेऊन एकूण दहा गुन्हे उघडकीस
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दरोडेखोरांचे टोळीकडून १८० ग्रॅमच्या सोन्याचे दागिने व रोख रकमेसह बारा लाखांचा माल हस्तगत करून एकूण दहा गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले आहे. याप्रकरणी एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दि. २९ सप्टेंबर रोजी युनिट एक गुन्हे शाखा पुणे येथील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे ओंकारेश्वर मंदिरजवळ शनिवार पेठ पुणे येथे सापळा लावून दरोडा टाकण्याचे तयारीत असताना संशयित आरोपी अरुण शिवाजी गायकवाड (वय ३८, रा. आनंदनगर मुंढवा, पुणे), मोहन गणेश जाधव (वय ३०, रा. केशवनगर मुंढवा), शिवराज अर्जुन वाडेकर (वय २२, रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा), प्रशांत मिठु थोरबोले (वय २२, रा. मांजरी बुद्रुक, पुणे), शीतल वाडेकर (वय २९, रा. सर्वोदय कॉलनी मुंढवा), भीमाबाई बजंत्री (वय ४५, रा. कोंढवा) यांना पकडण्यात आले होते.
त्यावेळी त्यांच्याकडून एक रिक्षा व कोयता, चॉपर, मिरची पुड, सेल्फ डिफेन्स पेपर स्प्रे १३ ग्रॅमची बाटली, दोन कटर असा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरबाबत त्यांचेविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नमुद आरोपींची पोलीस कोठडी रिमांड घेऊन त्यांना विश्वासात घेऊन तपास केला असता त्यांनी संगनमत करून बसमध्ये प्रवास करून बसमधील महिला व पुरुष प्रवासी यांना हेरून त्यांचे आसपास दाटीवाटी व गर्दी करून खिशातील रक्कम व महिलांच्या जवळील पर्स व हातातील सोन्याच्या बांगड्या/पाटल्या कटरने कट करून चोरल्याचे उघडकीस आलेले असून, एकूण दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) भाग्यश्री नवटके, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एककडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक.संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतीश भालेकर, दत्ता सोनावणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, विजेसिंग वसावे, महेश बामगुडे, इम्रान शेख, अजय थोरात, अमोल पवार, अशोक माने, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, मीना पिजंण, रुक्साना नदाफ यांनी केली.















