पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा : ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीने कोयता दाखवत ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करत पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी (Pimpri Police) आरोपीला अटक केली आहे.
अतुल उर्फ चांड्या अविनाश पवार (वय-28 रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक शहाजी वसंत धायगुडे (वय-39) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी अतुल याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी आणि त्यांचे सहकारी आरोपीला पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने कोयता जवळ बाळगून पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर धाऊन गेला. त्यानंतर हातात कोयता घेऊन ‘आज पंगा नाही घ्यायचा, नाहीतर विकेट’ अशी धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ‘आज दिवस तुमचा आहे, उद्या काय करणार, तुम्हांला मीच पुरा पडणार’ असे म्हणत पोलिसांना शिवीगाळ करुन धमकी दिली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
पोलिसांना जिवे मारण्याची धमकी देणारा आणखी एक गजाआड
हर्षल उर्फ गबर्या रामदास पवार (वय-28 रा. नेहरु नगर, पिंपरी) याला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचा कालावधी पूर्ण झाला नसताना तो बेकायदा शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांसोबत हुज्जत घालून पोलिसांच्या टीशर्टची कॉलर पकडली.
तसेच त्यांच्यासोबत झटापट करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी पोलीस शिपाई विकास जनार्दन रेड्डी यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.














