दापोडीतील पवारवस्ती येथे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. वारजे भागात दहशत माजवणाऱ्या गौरव पासलकर टोळीविरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेने ही कारवाई बुधवारी (दि. 6) पवार वस्ती दापोडी येथे केली.
पल्लु कमलेश चौधरी (वय-21 रा. चंद्रभागा व्हिला सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याचे साथीदार मंगेश विजय जडीतकर, गौरव सुरेश पासलकर, राजू लक्ष्मण गेहलोत यांच्या मदतीने एका युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन लुटले होते. त्यांच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखाचे खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रेकॉर्डवरील पाहिजे, फरार, तडीपार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस हवालदार अतुल साठे व प्रवीण राजपूत यांना वारजे येथील गुन्ह्यातील आणि मोक्क्यातील पाहिजे असलेला आरोपी पल्लू चौधरी हा आपली ओळख लपवून दापोडी येथील पवार वस्ती येथे राहत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार प्रविण राजपूत, अतुल साठे, नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमर पवार यांच्या पथकाने केली.















