चंदननगर पोलीस स्टेसनमध्ये फिर्याद : वडगावशेरीतील आनंद पार्क रोडवरील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स हिसकावून दुचाकीवरुन पळून जाणार्या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.
राहुल राजेंद्र पवार (वय 20, रा. आव्हाळवाडी रोड, वाघोली) असे या चोरट्याचे नाव आहे. ही घटना वडगाव शेरी येथील आनंदपार्क येथील रोडवर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणार्या एका 52 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या त्यांची सून आणि नात हे बाजारासाठी जात होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील छोटी पर्स हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आरोपीचा तोल गेल्यामुळे तो दुचाकीवरुन खाली पडला. यावेळी नागरिकांनी चोरट्याला पकडून ठेवले. याची माहिती चंदननगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्याला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.















