कोंढवा पोलिसांची कारवाई : कर्नाटकातून आरोपीला घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे – मजूर काम करणाऱ्या महिलेला काम देण्याच्या बहाण्याने कानिफनाथ डोंगराजवळ नेत तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर तिला चाकूचा धाक दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने लुटून कर्नाटक येथील मूळ गावी पळून गेला होता. कोंढवा पोलिसांनी त्याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने कर्नाटक येथून जेरबंद केले.
श्रीनिवास गणेश जाधव (३०, रा. थेरगाव, जगतापनगर, पिंपरी. मूळ रा. रायचूर, कर्नाटक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढव्यातील ४५ वर्षीय मजूर महिलेने फिर्याद दिली होती. ही घटना १ सप्टेंबर रोजी घडली होती.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला कोंढवा येथे वास्तव्यास असून बिगारी काम करते. जाधव याने महिलेला कोंढवा खुर्द येथून कानिफनाथ डोंगराजवळ गवत कापण्यासाठी म्हणून सोबत नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर तिच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तिला चाकूचा धाक दाखवून कानातील सोन्याचे वेल आणि पायातील चांदीच्या पट्ट्या जबरदस्तीने काढून घेत आरोपी पसार झाला होता.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील यांच्या सुचनेप्रमाणे अंमलदार किशोर वळे, ज्योतीबा पवार, निलेश देसाई यांनी कोंढवा ते वाकड, काळेवाडी, थेरगाव मजुरअड्डा पिंपरी चिंचवडपर्यंत रस्त्यावरील सीसीटीव्हींची तपासणी केली. या तपासामध्ये संशयीत आरोपी हा थेरगाव मजुरअड्डा, काळेवाडी येथून आल्याचे समजले. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास केल्यानंतर त्याचे नाव श्रीनिवास जाधव असून तो थेरगाव येथे राहत असून, त्याचे मूळ गाव रायचूर, कर्नाटक असल्याचे समोर आले. त्यानुसार त्याचा शोध सुरू होता. तपासाकामी कोंढवा पोलिसांनी दोन पथके तयार करून थेरगाव आणि कर्नाटकातील मूळ गावात रवाना केली. यातील एका तपास पथकाला तो मूळ गाव रायचूर येथे असल्याचे समजले. यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले.
कोंढवा पोलीस स्टेशनमधील रमेश गरूड, निलेश वनवे, तुषार आल्हाट, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.














