स्वारगेट पोलिसांची कारवाई : आरोपी एक महिना पोलिसांना गुंगारा देत होता
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे – खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरार आरोपीस स्वारगेट पोलिसांनी अटक केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी तब्बल एक महिना फरार होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
शाहरुख अजीज शेख (27, रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, तपास पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयात एक महिन्या पासून पाहिजे असलेला आरोपी मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी येथे आल्याची माहिती पोलीस शिपाई ज्ञाना बडे, मनोज भोकरे व फिरोज शेख यांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, तुषार भोसले पोलिस अंमलदार कुंभार, धावरे, शेख खेदांड, दळवी, तितमे, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, गोडसे साळवे, वाबळे, सरक खोमणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.















