राजगड पोलिसांची कारवाई : खेड-शिवापूर टोल नाक्याजवळील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुंबई-बंगळूर महामार्गावर शुक्रवारी (दि. 8) पहाटेच्या सुमारास राजगड पोलिसांनी तब्बल 6 किलो चरस जप्त केले. आरोपीने सॅकमध्ये चरस लपवून ठेवले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी एका नेपाळी तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुंबईहून गोव्याला निघालेल्या डॉल्फिन ट्रॅव्हल्समध्ये पोलिसांनी पहाटे पाच वाजता ही कारवाई केली.
याप्रकरणी मुस्ताकी रजाक धुनिया (वय-30 रा. नेपाळ) याला राजगड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, डॉल्फिन ट्रॅव्हल्स मधून एक व्यक्ती चरस घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना समजली होती. त्यानुसार राजगड पोलिसांनी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापळा रचला. टोल नाक्यावर एक संशयित लक्झरी बस बाजूला घेऊन तपासणी केली असता यातील धुनिया याच्याकडे चरस आढळून आले.
त्याच्याकडून सुमारे 32 लाख रुपये किमतीचे सहा किलो चरस जप्त केले आहे. याप्रकरणी धुनिया याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोज अवसरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जोशी, निखिल मगदूम, पोलीस हवलदार संतोष तोडकर, सोमनाथ जाधव, पी.एस. निकम, अजित माने, भगीरथ घुले, नाना मदने यांच्या पथकाने ही कारवाई केली.
