लोहगाव विमानतळावर उडाली होती खळबळ : पत्नीला रांचीहून परत येण्याचे विमान तिकीट न दिल्यामुळे प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्या एका संगणक अभियंत्याला विमानतळ पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. अफवेमुळे विमानतळावर खळबळ उडाली. रांचीला निघालेल्या विमान उड्डाणास तीन तास उशीर झाला.
ॠषीकेश सावंत (वय २८, रा. बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सावंत एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत संगणक अभियंता आहे. शुक्रवारी (८ ऑक्टोबर) सकाळी सावंत त्याच्या पत्नीला लोहगाव विमानतळावर सोडण्यासाठी गेला होता. त्याची पत्नी १६ ऑक्टोबरला पुण्यात परतणार होती. धावपट्टीच्या कामामुळे १६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरून देशात तसेच परदेशात जाणारी विमान उड्डाणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सावंत लोहगाव विमानतळावर विमान कंपनीच्या कार्यालयात गेला आणि त्याने १५ ऑक्टोबरचे तिकिट अधिकृत करून देण्याची मागणी केली.
विमान कंपनीने नकार दिल्यानंतर सावंत संतापला आणि त्याने विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवली. त्यानंतर त्वरीत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) पथक, पोलीस तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकाने विमानतळाची तपासणी सुरू केली. रांचीला निघालेल्या विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले. विमानाची तपासणी करण्यात आली. सावंतकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
चौकशीत सावंतने विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्याची कबुली दिली. पत्नीला रांचीहून विमान प्रवासाचे परतीचे तिकिट न दिल्याने त्याने अफवा पसरविण्याचे कृत्य केले, असे विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले. सावंतला अमली पदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून त्याची मानसिक स्थितीही ठिक नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
