युनिट-१ची कारवाई : तीन गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मारामारीच्या गुन्ह्यातील ७ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट-१ने मुसक्या आवळल्या. आरोपीवर खुनाचा प्रयत्न, मारामारी, दरोड्याची तयारी असे तीन गुन्हे भारती विद्यापीठ, बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.
राहुल संजय क्षीरसागर (वय २३, रा. जुनी पाण्याची टाकीजवळ, मांगडेवाडी, कात्रज, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-१मधील अधिकारी-कर्मचारी गस्तीवर होते. त्यावेळी सात वर्षांपासून फरार आरोपी आजीला भेटण्यासाठी मांगडेवाडी येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून पोलीस अंमलदार अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता उरुळी देवाची (ता. हवेली) येथे झालेल्या मारामारीमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी लोणी काळभोर (ता. हवेली) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अपर पोलीस आयुक्त (अति. कार्यभार) भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-१चे पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
