शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिराजवळ वेषांतर करून केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहर आणि जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी एकुण 11 गंभीर गुन्हयात वॉन्टेड असलेल्या आणि जिल्हा न्यायालयाकडून फरारी घोषित केलेल्या कुख्यात अॅड. सागर मारूती उर्फ राजाभाऊ सुर्यवंशी याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिराच्या जवळून अटक केली आहे. अॅड. सागर सुर्यवंशीच्या मागावर सीआयडीचे पथक होते. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
अॅड. सागर सुर्यवंशी याच्यावर पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तसेच पिंपरी, भोसरी एमआयडीसी आणि नवघर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. जमिनीच्या संदर्भात फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हयांचा त्यामध्ये समावेश आहे. पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयाकडून त्याला फरारी घोषित करण्यात आले होते. तसेच उच्च न्यायालयाने गेल्या 3 वर्षापासून फरार असलेला अॅड. सुर्यवंशीला का अटक होत नाही अशी विचारणा देखील सीआयडीकडे केली होती.
सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार, पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे यांनी अॅड. सुर्यवंशीवर कारवाई करण्यासंदर्भात पुण्याच्या सीआयडीला आदेश दिले होते.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि त्यांची टीम गेल्या काही दिवसांपासुन अॅड. सुर्यवंशीची माहिती काढत होती.
दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या टीममधील पोलिस निरीक्षक बाबर आणि पोलिस कर्मचारी देसाई तसेच दोरगे यांना अॅड. सुर्यवंशी हा रेणुका मातेचा भक्त असून तो दर्शनासाठी रात्री दहा वाजता पुण्याच्या शुक्रवार पेठेतील रेणुका माता मंदिर येथे येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली.
अप्पर पोलिस महासंचालक रितेश कुमार, महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,
पोलिस निरीक्षक बाबर, पोलिस कर्मचारी देसाई, दोरगे आणि इतर सहकार्यांनी अॅड. सागर सुर्यवंशीला पुण्याच्या शुक्रवार पेठेतून अटक केली आहे.
