हडपसर ससाणेनगर चौकातील घटना : मोमोज खाल्ल्यानंतर बिल मागितल्याने माजविली दहशत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही इथले भाई आहोत, कोणी आम्हाला बिल मागितले तर त्याची विकेट टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण करणाऱ्या चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसरमधील ससाणेनगर चौकात सोमवारी (दि. १० ऑक्टोबर) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.
ॲलेक्स मायकल (वय १९, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांचे मावसभाऊ प्रीतम जाधव, अभिषेक जाधव, हर्षल पुरोहित यांची ससाणेनगर चौकामध्ये मोमोज फूड जंक्शनची हातगाडी आहे. मोमोजची विक्री करीत असताना तीन अनोळखी व्यक्ती मोमोज खाण्यासाठी हातगाडीवर आले. त्यांनी मोमोज खाऊन बील न देता जात असल्याने त्यांना बिल मागितले म्हणून फिर्यादी व त्यांच्या मावसभावास मारहाण केली. तेव्हा फिर्यादीने मामाला बोलावून घेतल्यावर आरोपी काही वेळाने हातामध्ये लोकंडी कोयता घेऊन आले आणि आता यांची तर विकेट टाकतो, असे म्हणून मामा शिवप्रसाद बासुरंगन नायर यांच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार केले. फिर्यादींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातातील कोयता व रॉड हवेत गोल फिरवून आम्ही इथले भाई आहोत, कोणी आम्हाला बिल मागितले तर त्याची विकेट टाकू अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली.
त्यामुळे शेजारील हातगाडीवाले हातगाड्या सोडून पळून गेले. तसेच दुकानदारांनीही शटरबंद करून दुकाने बंद केली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.















