मुळशी तालुक्यातील प्रकरण : विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी!
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमसंबंध ठेवण्यात त्रास देत असल्याने त्याने आपल्याच भावाचा खून केला व मृतदेह पुरुन टाकला. जिच्यासाठी त्याने हे केले, तिचे दुसर्या मुलाबरोबर लग्न झाले. तरीही त्याच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरले नाही. त्याने या तरुणीबरोबरचे अश्लिल फोटो तिला पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर दोन वर्षापूवी झालेल्या खूनाचा गुन्हा उघडकीस आला.
जातेडे (ता. मुळशी) गावात नोव्हेंबर २०१९ मध्ये हा प्रकार घडला होता. पौड पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एम. एस. गायकवाड यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी योगेश विलास इंडोळे व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
गजानन इंडोळे (वय २३, रा. जातेडे, ता. मुळशी) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश इंडोळे याचे एका तरुणीवर प्रेमसंबंध होते. योगेशला तिच्याबरोबर लग्न करायचे असल्याचे गजानन याला माहिती होते. असे असतानाही गजानन हा तिला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी त्रास देत होता. हे योगेशला समजल्यावर त्याने नोव्हेंबर २०१९ मध्ये सतीश कदम यांच्या शेतावर झाडीमध्ये गजानन याच्या डोक्यात गळ्यावर स्प्रीकलर रॉडने घाव घालून त्याचा खून केला. त्याचे प्रेत योगेश व एका अल्पवयीन मुलाने खड्डा खणून त्यात पुरुन टाकून पुरावा नष्ट केला. दरम्यान, या तरुणीचे परतूर येथील मुलाबरोबर लग्न झाले. ती सासरी गेली. तेव्हा आता योगेश याने तिला तेव्हाचे काढलेले अश्लिल फोटो व्हायरल करेल, अशी धमकी देऊ लागला. या तरुणीने ही बाब आपल्या आईला कळविली. त्यानंतर त्यांनी परतूर पोलिसांकडे धाव घेतली. परतूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन योगेश इंडोळे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या तपासात याच प्रेमसंबंधातून त्याने आपल्या भावाचा खून केला असल्याची कबुली दिली. दरम्यान, ही माहिती परतूर पोलिसांनी पौड पोलिसांना दिल्यावर त्यांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.















