मुंबई-बंगळूर महामार्गावर कारवाई : पुणे ग्रामीण पोलिसांची शोध मोहीम सुरू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चरस तस्कर प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिसांनी एका आरोपीला खेड शिवापूर टोल नाक्यावर अटक केली होती. त्याला तपास कामासाठी गोव्याला नेले असताना पोलिसांच्या तावडीतून सोमवारी (दि.11) पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाला पोलीस ग्रामीणच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला असून गोव्यात आरोपीचा शोध सुरु असल्याचे सांगितले.
मुस्ताकी रजाक धुनिया (वय-30 रा. नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
राजगड पोलिसांनी 8 ऑक्टोबर रोजी पुण्यातील मुंबई-बंगळूर महामार्गावर मोठी कारवाई करुन तब्बल 6 किलो चरस जप्त केले होते. आरोपीने हे चरस त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये लपवून ठेवले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या चरसची किंमत 32 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत असले तरी अंतराराष्ट्रीय बाजारात त्याचे मुल्यांकन साडेतीन कोटी पेक्षा अधिक आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
तो नेपाळचा असल्याने त्याची अंमली पदार्थाची तस्करी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु आहे का, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकिलांनी केली होती. त्यानुसार पुढील तपासणीसाठी त्याला राजगड पोलीस व पुणे गुन्हे शाखेने संयुक्तपणे तपासासाठी गोव्याला घेऊन गेले होते.
आरोपीला पुढील तपासासाठी रविवारी सकाळी म्हापसा (गोवा) येथे घेऊन गेले होते. त्याठिकाणी म्हापसा पोलिसांना पत्र देऊन आरोपीला आपल्या कस्टडीमध्ये ठेवणे गरजेचे होते पण तसे न करता राजगड पोलीस व पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला खासगी हॉटेलमध्ये फक्त बेड्या घालून आपल्या ताब्यात ठेवले. यावेळी राजगड पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हवालदार महेश खरात, संतोष तोडकर, शरद धेंडे तर पुणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, मंगेश भगत, अमोल शेडगे, पुनम गुंड यांचा बंदोबस्त होता.
राजगड पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेचे अधिकारी व पोलीस झोपल्याने सोमवारी पहाटे आरोपी मुस्ताकी धुनिया बेड्यांसह फरार झाला. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे.
गोव्यातील चरस रॅकेट, मुंबई, बिहार पटना व नेपाळ चरस रॅकेट या प्रकरणांचा आता पुढील तपास कसा करणार याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी फरार झाल्याची तक्रार पोलिसांनी म्हापसा पोलीस ठाण्यात केली आहे.
