बिबवेवाडीतील घटनेने परिसरात खळबळ- घटनास्थळावरून सराव करणाऱ्यांसह नागरिकांनी काढला पळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एकतर्फी प्रेमामधून आठवी मध्ये शिकणाऱ्या 14 वर्षीय कबड्डीपटू मुलीचा यश लॉन्स येथे नात्यातील तरुणाने धारदार कोयत्याने मानेवर वार करून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या मुलीची हत्या होत असताना या ठिकाणी लहान मुले कबड्डीचा सराव करीत होते. तसेच नागरिक चालण्याचा व्यायाम करीत होते. हा थरार पाहून सर्व जण तिथून पळाले.
आरोपीचे नाव शुभम भागवत (वय 25) असे निष्पन्न झाले आहे. वडील अनंत व्यवहारे यांचा स्कुल व्हॅनचा व्यवसाय आहे. आरोपी शुभम हा त्यांच्या भावाच्या साडूचा मुलगा होता.
पोलिसांनी सांगितले की, मुलगी आठविमध्ये शिकत होती. ती कबड्डी खेळाडू होती. ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत यश लॉन्स परिसरात कबड्डीचा सराव करीत होती. यावेळी तिच्या नात्यातला एक तरुण आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी आले. त्याने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी त्याने तिच्या मैत्रिणींना लांब पळवून लावले. सोबत आणलेल्या कोयत्याने तिच्या गळ्यावर वार केला. ती खाली पडल्यानंतर त्याने तिच्या गळ्यावर एकामागे एक असे वार करण्यास सुरुवात केली. अत्यंत भीषण पद्धतीने आरोपीने तिचा खून केला आहे. धडापासून मुंडके वेगळे करण्याचा त्याने प्रयत्न केल्याचे घटनास्थळी झालेल्या पंचनाम्यामधून दिसून येते. खून केलेला कोयता आणि अन्य शस्त्र तेथेच टाकून आरोपी पसार झाले. आरोपीने सोबत अग्निशस्त्र देखील आणले होते. मात्र त्याला फायर करता आला नाही.
भयानक घटना घडण्याच्या थोडावेळ आधीच पोलिसांची गस्त घालणारी गाडी तिथून गेली होती. तरीदेखील एवढी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. इतक्या निघृतपणे झालेल्या खूनामुळे खून झालेल्या मुलीच्या मैत्रिणी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होत्या. मुलीच्या घरातील नातेवाईक आक्रोश करून रडत होते.
पोलीस उपायुक्त म्हणाल्या की, ‘एकतर्फी प्रेमातून सदर खून झाल्याची माहितीसमोर आली आहे, नात्यातील मुलाने व त्याच्या दोन मित्रांनी खून केलेला असून त्यांचा शोध घेत आहोत.’ असे त्यांनी सांगितले.
