महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने सामूहिक शिवविचारातून बार्शी येथील डाकघरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात गरजू व हुशार अशा पाच शिवकन्यांच्या नावाने प्रत्येकी ₹5,000 ची मुदतठेव (एफडी) करून त्यांचे पोस्टाचे पासबुक त्यांच्या पालकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषात अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे पोलीस उपनिरीक्षक धनाप्पा शेटे, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नितीन सोडळ, बार्शी पोस्टमास्तर उल्हास सुतार, डाकघर जनसंपर्क निरीक्षक राहुल जाधव तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी उपस्थित होते.
संस्थेचे सहसचिव नागनाथ सोनवणे यांनी आपल्या मनोगतात महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून संस्थेची उद्दिष्टे व आगामी उपक्रमांची माहिती दिली. राहुल जाधव यांनी शिवचरित्र व संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देत या उपक्रमासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
पोलीस उपनिरीक्षक धनाप्पा शेटे यांनी शिवरायांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगत, ओन्ली समाजसेवा संस्था बार्शीत विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याबद्दल कौतुक केले आणि भविष्यातही समाजोपयोगी कार्य घडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शिवजयंतीनिमित्त पुढील विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रत्येकी ₹5,000 ची एफडी असलेले डाक पासबुक प्रदान करण्यात आले कु. स्वरा शंकर शिंदे – ( यशवंतराव चव्हाण नगरपरिषद शाळा क्र. १५) , कु. कादंबरी सचिन माने – (कन्या प्रशाला, बार्शी), कु. सरस्वती दिलीप वाघमारे – ( न्यू हायस्कूल, कुसळंब ता. बार्शी) , कु. निशा कैलास जानराव – (प्रॅक्टिसिंग स्कूल, बार्शी) , कु. सोनाली दिलीप निंबाळकर (छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळा क्र. १)
कार्यक्रमास अध्यक्ष राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, उपाध्यक्ष संतोष शेळगावकर, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार मानकोजी ताकभाते तसेच सुनील फल्ले, सुरेंद्र स्वामी, भरत जाधव, रतिकांत हमने, प्रतीक खंडागळे, दत्तात्रेय कांदे, अतुल वाणी, नगरसेविका सायरा मुल्ला, रेखा विधाते, रागिणे झेंडे, सुजाता अंधारे, कोमल वाणी, अनुसया आगलावे, माधुरी वाणी, रेखा सरवदे, आशादेवी स्वामी, त्रिशाला मिसाळ, अरुणा शेळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सचिव अजय तिवारी यांनी शिवजयंतीनिमित्त पोस्ट खात्यातील सर्व कर्मचारी, महिला वर्ग, शिवप्रेमी पत्रकार तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले.
















