शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील टोळीप्रमुखाचा भाऊ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : डोणजे येथे राहत असताना आणि नावावर गुन्हे दाखल असतानाही लोणी काळभोर येथील पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांच्या खून प्रकरणात तो सध्या कारागृहात आहे. मधल्या काळात अनेकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून शस्त्र परवाने मिळविल्याचे समोर आले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार सर्व शस्त्र परवान्यांची सध्या तपासणी केली जात आहे. या चौकशीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार तेज भोसले यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रोहित भामे याने २०२३ मध्ये शस्त्र परवाना मिळविला होता. भामे याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नवीन शस्त्र परवाना मिळविण्यासाठी त्याने लोणी काळभोर येथील तरवडी रानमळा येथील पत्ता पुरावा म्हणून आधारकार्ड सादर केले.
तसेच हमीपत्र व इतर कागदपत्रेही सादर केली होती. हमीपत्रामध्ये त्याच्याविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दिवाणी किंवा फौजदारी खटला सुरू नसल्याचे नमूद केले होते. या आधारकार्ड व हमीपत्राच्या आधारे त्याने तत्कालीन पोलीस आयुक्तांकडून शस्त्र परवाना मिळविला.
रोहित भामे याने दिलेल्या पत्त्यावर लोणी काळभोर पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता तेथील नागरिकांनी सांगितले की, रोहित भामे हा तरवडी रानमळा येथे कधीही वास्तव्यास नव्हता. आधारकार्डावरील पत्ता खोटा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
रोहित भामे याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे दाखल असतानाही त्याची माहिती लपवून खोटे हमीपत्र सादर करून त्याने शस्त्र परवाना मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा शोध घेत असताना तो कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करून खून केल्याच्या प्रकरणात हवेली पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो टोळीप्रमुख योगेश भामे याचा भाऊ आहे. या टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली असून तेव्हापासून तो कारागृहात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे करीत आहेत.
















