मुंढवा पोलिसांत गुन्हा : केशवनगर-मांजरी रस्त्यावर झाला अपघात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव डंपरची दुचाकीस्वाराला धडक बसून केशवनगर-मांजरी रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ओम साई फॅब्रिकेशन दुकानाच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता ही घटना घडली.
राजेंद्र केंद्रे (वय ४३, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या डंपरचालकाचे नाव आहे.
विनोद गेंदलाल सूर्यवंशी (वय ४५, रा. संभाजी चौक, केशवनगर-मुंढवा, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार विनोद पिल्ले यांनी मुंढवा पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, डंपर केशवनगर-मांजरी रस्त्यावर भरधाव वेगात जात असताना दुचाकीला धडक बसून अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. काटे करीत आहेत.
