हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बदनामीची दिली धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना तसेच एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीची निर्घृण हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. एमपीएससीच्या क्लासला जाणार्या महिलेची भर दिवसा रस्त्यावर अनेकदा छेडछाड होत असल्याचे आढळून आले आहे.
याप्रकरणी एका २६ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम संभाजी गरुड (वय २२, रा. ढमाळवाडी, हडपसर) आणि हर्षद मारुती कुंजीर (वय २२, रा. पापडे वस्ती, हडपसर) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विवाहित असून, त्या सध्या एमपीएससीचा अभ्यास करीत आहेत. त्यासाठी त्या भेकराईनगर येथील एका अभ्यासिकेत जातात. तेथे जात असताना आरोपी हे त्यांचा पाठलाग करुन त्यांच्याकडे घाणेरड्या नजरेने बघत असत. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्यांची आणखी हिंमत वाढून ते त्यांच्या जवळून जाऊन त्यांच्या अंगाला स्पर्श करुन येण्या- जाण्याच्या मार्गात उभे रहात. १३ सप्टेंबर रोजी भर दुपारी साडेचार वाजता या दोघा टोळभैरवांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांच्याकडून जबरदस्तीने मोबाईल नंबर घेतला. तसेच, त्यांना फोनवर बोलल्या नाही तर बदनामी करण्याची धमकी दिली.
या प्रकाराने त्या घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी ही हकीकत घरी सांगितली. पती व दीराने धीर दिल्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.
