पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : आरोपीस जमशेदपूर, झारखंड येथून घेतले ताब्यात
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ‘जीमॅट’ या आंतरराष्ट्रीय एमबीएकरिता असणारी पूर्व परीक्षा ऑनलाइन रिमोट ॲक्सेस घेऊन जास्त गुण मिळवून देणाऱ्या आरोपीस जमशेदपूर, झारखंड येथून सायबर पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली.
फिर्यादी यांना परदेशात एमबीए करणेकरिता प्रवेश घ्यावयाचा असल्याने त्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर ‘जीमॅट’ या एमबीए पूर्व परिक्षेबाबत सर्च केले असता त्यांना GMAT_GRE_SHORTCUT ही इन्स्टाग्राम प्रोफाइल दिसून आली. त्यामध्ये प्रवेशाकरिता असणाऱ्या GMAT या पूर्व परीक्षेमध्ये १०० टक्के चांगल्या गुणांची हमी देण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी सदर इन्टाग्राम प्रोफाईलच्या माध्यमातून प्रोफाइल धारकाशी संपर्क साधून सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार ७५० पेक्षा अधिक गुणांकरिता ४ लाख ७४० पेक्षा अधिक गुणांकरिता ३ लाख ७० हजार, ७३० पेक्षा अधिक गुणांकरिता ३ लाख ५० हजार, ७२० पेक्षा अधिक गुणांकरिता ३ लाख ७१० पेक्षा अधिक गुणांकरिता २ लाख सत्तर हजार आणि ७०० पेक्षा अधिक गुणांकरिता २ लाख ५० हजार असे रेट असल्याचे आरोपींनी सांगितले.
यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्या संगणकाचा ऐनीडेस्क, डीडब्ल्यू सर्व्हिसेस व वुई ट्रान्स्फर या ॲप्लीकेशनद्वारे ॲक्सेस घेऊन आंतरराष्ट्रीय एमबीएची पूर्व परीक्षा फिर्यादी हेच देत आहेत, असे भासवून यातील आरोपी यांनी पूर्व परीक्षा दिली. त्यामध्ये फिर्यादी यांना खरोखरच ८०० पैकी ७७० गुण मिळाले. त्यामुळे यातील आरोपी यांनी फिर्यादी यांच्याकडे वारंवार ४ लाख रुपयांची मागणी केली. परंतु फिर्यादी यांना सदरची रक्कम द्यावयाची नसल्याने व वरील सर्व प्रकार हा फसवणुकीचा वाटल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे सायबर पोलीस स्टेशन कडून सखोल तपास सुरू करण्यात आला. त्यामध्ये फिर्यादी यांच्याशी संपर्क करण्यासाठी वापरण्यात आलेले इन्स्टाग्राम प्रोफाइल, बँक अकाऊंट, मोबाईल क्रमांक व ऐनीडेस्कच्या युजर आयडीचे तांत्रिक विश्लेषणामध्ये यातील आरोपी हे जमशेदपूर, झारखंड येथील असल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक विश्लेषणामध्ये निष्पन्न माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील व तपासपथक यांनी जमशेदपूर झारखंड येथे जाऊन अत्यंत कौशल्यपूर्ण व शिताफीने बाहेरील राज्यात सापळा रचून आरोपी नामे अभय मिश्रा रा. मानगो, जमशेदपूर, झारखंड यास अटक केली असून त्याचेकडून १ लॅपटॉप, १ मोबाईल संच ४ पेनड्राईव्ह ४ डेबीट कार्ड व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक आरोपीची २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे.
सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गवारी, अंमलदार अस्लम आत्तार, राजकुमार जाबा, शाहरुख शेख, श्रीकांत कबुले, शिरीष गावडे व नीलम साबळे यांच्या पथकाने केली आहे.
