पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा-२०२१ स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षा प्रवास नागरिकांना सुरक्षित वाटला पाहिजे, एवढी विश्वासार्हता निर्माण केली, तर रिक्षाचालकांप्रती आदर भावना समाजामध्ये निर्माण होईल. त्यासाठी ग्राहक देवो भवो मानून सेवा देण्यासाठी रिक्षाचालकांनी एक पाऊल पुढे टाकून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.
कॅम्पमधील आझम कॅम्पसमध्ये लष्कर पोलीस स्टेशन हद्दीतील रिक्षाचालकांसाठी नवरात्रौत्सव-२०२१ निमित्त आयोजित ”माझी रिक्षा सुरक्षित रिक्षा-२०२१’ स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला होता. याप्रसंगी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, स्पर्धेतील रिक्षाचालक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या हस्ते १० सायकलिंगची फित कापून हिरवा झेंडा दाखवून लष्कर पोलीस स्टेशन हद्दीत सायकल पेट्रोलींगचा शुभारंभ करण्यात आला.
विजेत्यांना पारितोषिके…
स्पर्धेतील विजेते : प्रथम- अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय- पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय- तीन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ पाच रिक्षाचालकांना प्रत्येक एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि लष्कर पोलीस स्टेशन यांच्या वतीने एक लाख रुपयांचा विम्याचे प्रमाणत्र देण्यात आले.
पुणे शहरामध्ये महिला, बालके, ज्येष्ठ नागरिकांच्या अनुषंगाने पुणे शहरात मागील काही दिवसात रिक्षाचालकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. रिक्षाचालकांनी प्रतिमा बदलण्यासाठी शहरातील नागरिकांना रिक्षात प्रवास करताना सुरक्षितता वाटली पाहीजे, त्यासाठी पोलीस दल आणि प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत प्रवाशांना सेवा देण्याची सवय लावून घेतली पाहिजे.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे
