अंमली पदार्थविरोधी पथक १ व २ ची कारवाई : ११ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मुळशी भागात गांजाची शेती उध्वस्त करून चौघांना अटक केली. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ व २ ने संयुक्त कारवाई करून ११ लाख ६३ हजार १०० रुपयांचा १७३ किलो ९७५ ग्रॅम गांजा जप्त केला.
चेतन मारुती मोहोळ (वय २७, रा. कानिफनाथ सोसायटी, न्यू डीपी रोड, कोथरूड, पुणे), साहेबा हुलगाप्पा म्हेत्रे (वय २०, रा. गादिया इस्टेट, महाराजा कॉम्प्लेक्स, पौड रोड, कोथरूड, पुणे), प्रकाश वाघोजी खेडेकर (वय ३५), इंदुबाई वाघोजी खेडेकर (वय ६५, दोघे- रा. गवळीवाडा अंबरवेट, पौड, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-२चे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण स्टाफसह गस्त घालीत असताना चेतन मोहोळ व साहेबा हुलगाप्पा या संशयितांच्या अंगझडतीमध्ये ५८० ग्रॅम गांजा व एक दुचाकी असा ५१ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त करून कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास अंमली पदार्थविरोधी पथक-१ने आरोपींनी गांजा कोठून व कोणाकडून आणला याविषयी तपास सुरू केला. त्यावेळी गांजा गवळीवाडा, अंबरवेट, पौड, ता.मुळशी येथून आणल्याचे सांगितले. त्यानंतर नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत जाऊन तपास केला खेडेकर यांच्या घरामध्ये १८ किलो ९९५ ग्रॅम गांजा मिळून आला. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर २५० गांजाची झाडे उद्ध्वस्त करून १५४ किलो ४०० ग्रॅम असा एकूण सात लाख ७१ हजार ५०० रुपयांचा अंमलपदार्थ जप्त केला.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ व २चे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार सुजीत वाडेकर, संदीप जाधव, मनोज साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, विशाल शिंदे, नितेश जाधव, योगेश मोहिते, रेहना शेख, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयूर सूर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आजिम शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, संतोष जाचक, महेश साळुंके, दिशा खेवलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
