चंदननगर पोलिसांची कामगिरी : दोघांकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : ॲपल कंपनीचा मोबाईल, लॅपटॉप, घड्याळ विकण्याचा बहाणा करून फसवणूक करण्याऱ्या दोघा आंतरराज्यीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात चंदननगर पोलिसांना यश मिळाले असून, त्यांच्याकडून पावणेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव आणि तपास पथकातील अंमलदार असे खाजगी वाहनाने चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ॲन्टी चैन स्नॅचिंग तसेच वाहनचोरी प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना जाधव यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम खराडी भागामध्ये फिरत असून, ते त्यांचेकडे असलेले ॲपल कंपनीचे मोबाईल फोन हे त्यांनी कस्टममधून विकत घेतल्याचे सांगून, खराडी भागामध्ये विक्री करण्यासाठी फिरत आहेत.
सदरबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने, चंदननगर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीतील आरोपी यांची गुन्हा करण्याची पद्धत व बातमीतील वर्णनाचे इसमांचे काम करण्याची पद्धत यामध्ये साम्य आढळून आल्याने सदर बातमी सपोनि जाधव यांनी वरिष्ठांना कळवून सोबत असलेल्या पोलीस कर्मचारी यांच्या टीम तयार करून, वेगवेगळ्या रोडला पेट्रोलिंग करून बातमीतील वर्णनाचे इसमांचा शोध घेणेकामी टीमने रवाना झाले.
त्याच दरम्यान पोलीस शिपाई कांबळे यांनी फोन करून कळविले की, त्यांना बातमीतील वर्णनाचे इसम हे गंगा कॉन्स्टेला सोसायटीपासून खराडी गावाकडे जाणाऱ्या रोडवरती गंगा कॉन्स्टेला सोसायटीपासून थोड्या अंतरावर दोन इसम मिळून आलेले आहेत. त्यांना ताब्यात घेतले आहे, असे कळविले असता सर्व पोलीस स्टाफ त्या ठिकाणी एकत्र जमा झाले.
इक्राम सुलेमान मलीक (वय ३९, रा. पसोंडा, गाझीयाबाद, उत्तर प्रदेश) आणि अल्लाउद्दीन अलीमुद्दीन मलीक (वय ३७, रा. पसोंडा, जि-गाझीयाबाद, उत्तर प्रदेश) अशी त्यांची नावे असून, दोघांकडे बजाज चेतक गाडी मिळून आली. सदरची गाडी ही चंदननगर पोलीस स्टेशनमधील दाखल गुन्ह्यातील आरोपी यांनी वापरलेली गाडी असल्याची खात्री झालेली असून, त्या दोघांना त्या ठिकाणाहून त्यांचेकडील गाडीसह ताब्यात घेतले.
या दोघांना चंदननगर पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन त्या दोघांकडे अधिक तपास केला असता त्या दोघांनीही सांगितले की, आम्ही खराडी भागामध्ये एका व्यक्तीस त्यांनी कस्टममधून खरेदी केलेले ॲपल कंपनीचे मोबाईल फोन, लॅपटॉप व वॉच असल्याचे दाखवून त्यापोटी ६० हजार रुपये घेऊन त्यानंतर त्या व्यक्तीस एका काळ्या रंगाचे बॅगमध्ये वीट व काळ्या रंगाचा एक छोटा पाऊच त्यामध्ये काच अशी बॅग देऊन पैसे घेऊन पळून गेलो होतो, अशी कबुली दिली आहे. तसेच त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे पुणे शहर, पिंपरी चिंचवड या शहरामध्ये केले आहेत, अशी कबुली दिल्याने त्यांचेकडून ॲपल कंपनीचे तीन मोबाईल, एक लॅपटॉप, एक घड्याळ व बॅग असा एकूण ३,८५,६५० रु.चा मुद्देमाल दाखल गुन्ह्याचे पुरावे कामी जप्त करून त्यांना अटक केली आहे.
सदरची कारवाई ही, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनील जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील थोपटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, पोलीस अंमलदार अमित कांबळे, सुभाष आव्हाड, राहुल इंगळे, नामदेव गडदरे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, गणेश हांडगर, शकुर पठाण, युसूफ पठाण, अतुल जाधव यांनी केलेली आहे.
