पुण्यात काढली रॅली : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : येरवडा कारागृहातून जामीनावर सुटल्यानंतर गुन्हेगाराची त्याच्या साथिदारांनी पुण्यात दुचाकी रॅली काढली होती. गुन्हेगाराची दुचाकी रॅली काढणे साथिदारांना चांगलेच महागात पडले आहे. गुन्हेगाराची रॅली काढणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ने मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली आहे.
वैभव ऊर्फ पप्या शांताराम उकरे (वय-22 रा. कर्वेनगर), सुयश उर्फ मनोज संजय दिघे (वय-22 रा. कर्वेनगर), आशिष उर्फ शुटर मच्छिंद्र माने (वय-22 रा. वडारवस्ती, कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्या उकरे विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात उकरे व त्याचा साथीदार येरवडा कारागृहात होता. त्या दोघांना 8 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर वैभव, सुयश आणि आशिष यांच्यासह 30 ते 35 जणांच्या टोळक्याने येरवडा कारागृह ते कर्वेनगरपर्यंत दुचाकीवर रॅली काढली होती.
याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी फरार झाले होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रॅली काढणारा वैभव उकरे, मनोज दिघे हे दोघे कोथरुड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे व यशवंत ओंबासे यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तिसरा आरोपी आशिष माने याला वडारवस्ती परिसरातून अटक केली.
