हडपसर पोलिसांची कामगिरी : विधिसंघर्षित बालक ताब्यात, पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी दिली.
युनूस निजाम मुल्ला (वय २५, रा. सध्या गल्ली नं.१६, सय्यदनगर, हडपसर, मूळ- मु.पो. चिंचोली, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), हनुमंत शंकर वाकडे (वय २२, रा. मु.पो. आलूर, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद), दीपक ऊर्फ खंडू तातेसाहेब कटकधोंड (वय २४, रा. केसर जवळ, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून, विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील भाजीपाला मार्केट, बाजारपेठ, मॉल अशा गर्दीच्या ठिकाणी पोलीस गस्तीवर होते. त्यावेळी हडपसर हद्दीतून एक अल्पवयीन मुलासह दोघेजण दुचाकी चोरून सोलापूर महामार्गाने जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अल्पवयीनसह दोघेजण वाहनांची टहाळणी करीत असल्याचे समजले. त्यानुसार फुरसुंगीतील सार्वजनिक शौचालयाजवळ सापळा रचून संशयावरून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे अधिक तपास केला असता आपसात ग्रुप बनवून हडपसर, वानवडी, स्वारगेट, फरासखाना या भागात गर्दीच्या ठिकाणी गाड्यांची टहाळणी करण्यासाठी विधिसंघर्षित बालकाला पुढे पाठवून, गाडी पार्क केलेली व्यक्ती कोठे आहेत, हे पाहून बनावट चावीने दुचाकी चोरी करीत होते, अशा पद्धतीने गाड्यांची चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त केल्या, असून त्यांच्याकडून हडपसर-७, फरासखाना आणि स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येकी एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले असून, उर्वरित तीन वाहनांच्या मालकाचा शोध सुरू आहे.
कल्याणराव विधाते म्हणाले की, कोरोनाचा ज्वर कमी झाला असून, दिवाळीनिमित्त खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. दिवाळीसणाला गावाकडे जाणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे प्रत्येकाने शेजारी खरा पहारेकरी समजून त्यांना लक्ष ठेवण्यास सांगणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाताना मौल्यवान वस्तू व मुलांना सांभाळावे, असे आवाहन त्यांनी केले.
अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, गणेश क्षीरसागर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
