खराडी बायपास पदपथावर घडली घटना : दागिने बॅगेत ठेवण्यास सांगून हातचलाखीने चोरले दागिने
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आम्ही सीआयडी पोलीस आहोत, सकाळीच एका महिलेच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने काढून नेले आहेत. तुम्ही तुमचे दागिने बॅगेत ठेवा असे सांगून हातचलाखीने सोन्याचे गंठन व बांगड्या असा सुमारे दोन लाख आठ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून चोरटे दुचाकीवरून पळून गेले. ही घटना खराडी बायपास रस्त्यावरील पदपथावर सोमवारी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
ही घटना चंदननगरमधील खराडी बायपास रोडवरील पदपथावर सोमवारी (दि. १५ नोव्हेंबर २०२१) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी खराडीतील ६५ वर्षीय महिलेने चंदनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची मुलगी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये धनादेश वटविण्यासाठी खराडी बायपास रस्त्यावरील पदपथावरून जात होती. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी आम्ही सीआयडी पोलीस आहोत, सकाळीच एका बाईच्या गळ्याला चाकू लावून सोन्याचे दागिने काढून नेले आहेत. तुम्ही तुमचे गंठन व हातातील सोन्याच्या बांगड्या काढून बॅगेमध्ये ठेवा, असे सांगितले. मात्र, हातचलाखीने भामट्यांनी बॅगेत ठेवलेले सोन्याचे गंठन व बांगड्या सुमारे दोन लाख ८ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन दुचाकीवरून फरार झाले. चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे पुढील तपास करीत आहेत.
