कोंढव्यातील गोकुळ हॉटेलसमोर कारवाई : कोंढवा पोलिसांत 15 लाखांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक युवराज ढमाले यांना गाडीखाली चिरडून मारण्याची धमकी देण्यात आली असून, 15 लाखांच्या खंडणीची मागणीदेखील करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवीलाल देवजीलाल प्रजापती (वय 40), जितू प्रजापती (रा. कोंढवा) आणि एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध खंडणी, जीवे मारण्याची धमकी देणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी युवराज सिताराम ढमाले (रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. ढमाले हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांची कोंढव्यातील गोकुळ हॉटेलसमोर साईट सुरू आहे. काम पुर्ण झालेल्या बांधकामाच्या साईटवरील बहुतांश फ्लॅटचा ताबा काही सदस्य वगळता इतर सर्वांना देण्यात आलेला आहे. त्यांनी फ्लॅटधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था अंतर्गत सोसायटी स्थापन केली आहे.
आरोपी देवजीभाई प्रजापती यांना फ्लॅटचा ताबा दिलेला आहे. तरीदेखील प्रजापती याने जितू प्रजापती व अन्य आरोपीच्या मदतीने सदस्यांनी मिटींग बोलावुन, कॉमन ॲमिनिटीजचा ताबा अजुन आम्हाला दिला नाही असे म्हणत वाद घातला. सोसायटीच्या सदस्यांना भडकवुन तुमच्याविरुद्ध तक्रार करायला भाग पाडुन, तुमची बदनामी करीन अशी धमकी दिली. तसेच १५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून रक्कम न दिल्यास गाडीखाली चिरडुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी ढमाले यांनी तक्रार आणि आवश्यक पुरावे दिल्यानंतर पोलिसानी गुन्हा दाखल केला असून तपासला सुरुवात केली आहे. यासंदर्भात ढमाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

















