खंडणी विरोधीपथक-१ ची कारवाई : कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बापू नायर टोळीतील सराईत आरोपीला गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक-१ने जेरबंद केले. त्यावर शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील तपासासाठी कोथरूड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
शकील अमीर याळगी (रा. न्यू टिळेकर नगर, इस्कॉन मंदिरच्या मागे, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१कडून सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी पाहिजे असलेला आरोपी इंदिरानगर येथे राहत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चैत्रबन वसाहत, अप्पर इंदिरानगर येथे सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपी शकील अमीर याळगी हा बापू नायर टोळीतील गुन्हेगार असून, त्याच्यावर सहकारनगर-३, वारजे-माळवाडी, सांगावी, कोंढवा-२, हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढील तपासासाठी आरोपीला कोंथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक-१चे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस नाईक रमेश चौधर, पोलीस नाईक नितीन कांबळे, पोलीस नाईक अमोल आवाड, पोलीस नाईक गजानन सोनवलकर, पोलीस नाईक दुर्योधन गुरव, पोलीस नाईक विजय कांबळे, पोलीस शिपाई अमर पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
















