कोंढवा पोलिसांची कामगिरी : खून केल्यानंतर आरोपी पळून गेले होते
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आमच्या जागेत येऊन लफडे करता असे म्हणून रिक्षाचालक व सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन सुरक्षारक्षकाचा खून करणार्या चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
ऋषीकेश राजेश गायकवाड (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा), किशोर भागवत गायकवाड (वय २९, रा. खडी मशीन चौक) जुबेर पापा इनामदार (वय ३७, रा. इनामदार वाडा, कोंढवा) आणि अमीन मुसा पानसरे (वय २३, रा. चांदतारा चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रवी कचरु नागदिवे (वय ५०, रा. उरुळी देवाची) या सुरक्षारक्षकाचा खून झाला होता. तर, रिक्षाचालक बालाजी भिमा चव्हाण (वय ३५, रा. पीर वस्ती, वडकीगाव) हे जबर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, रवी नागदिवे यांच्या ओळखीची एक महिला येवलेवाडी येथील डोंगराजवळच्या एका घरात रहाते. त्यावरुन त्या ठिकाणी प्लॉटिंगचे काम करणार्या आरोपींनी हे आपल्या जागेत अनैतिक संबंधासाठी येत असल्याचा समज करुन घेतला होता. त्यावरुन रवी नागदिवे याला सोमवारी फोन करुन बोलावून घेतले होते. बालाजीच्या रिक्षातून रवी तेथे गेला. तेव्हा तुम्ही आमच्या जागेत लफडे करण्यासाठी येता बाहेरुन बाया घेऊन येता आणि येथे लफडे करता तुम्हाला आता सोडणार नाही, असे म्हणून त्यांनी दोघांना लाकडी बांबुने डोक्यात, हातापायावर बेदम मारहाण केली. त्यात रवी नागदिवे याचा मृत्यु झाला.
त्यानंतर त्यांनी बालाजीच्या रिक्षात दोघांना घालून उंड्री चौकात आणले. तेथे रिक्षात दोघांना तसेच सोडून ते पळून गेले. त्यानंतर या दोघांना रुग्णालयात नेले असताना रवी नागदिवे याचा मृत्यु झाला. बालाजी चव्हाण यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत पुढील तपास करीत आहेत.
















