गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : 20 लाखाचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात झालेल्या टी-20 च्या अखरेच्या सामान्यावर सट्टा घेणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील कात्रज भागात करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमर नारायण करपे (वय 30, रा. बीड), अजित पवार (वय 20), महेश मुळे (वय 20, दोघे रा. लातूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार अविनाश हलगे, आकाश तट, सौरभ देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांनी यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कात्रज भागातील त्रिमूर्ती चौकात एका इमारतीत क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकून कारवाई केली. कारवाईत रोकड तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले तपास करत आहेत. आरोपींकडून मोबाइल संच जप्त करण्यात आले असून ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने सीमकार्ड घेऊन त्याचा वापर सट्टा घेण्यासाठी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.