सदनिका गैरव्यवहार प्रकरण : सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांचा आदेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सदनिका खरेदी व्यवहारात पैसे भरून देखील सदनिकेचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पाषाणकर यांनी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सत्र न्यायाधीश जी.जी. भालचंद्र यांनी गौतम पाषाणकर यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंगळवारी (दि.23) फेटाळून लावला.
फसवणूक केल्याप्रकरणी गौतम विश्वानंद पाषाणकर (रा. सेनापती बाबट रोड) यांच्यासह दोघांविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिपालसिंह विजयसिंह ठाकोर (वय-61 रा. पंचवटी, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे.
पाषाणकर यांच्या खराडीतील गृहप्रकल्पामध्ये फिर्यादी ठाकोर यांनी 1 कोटी 56 लाख रुपये देऊन सदनिका खरेदी केली होती. सदनिका खरेदी व्यवहारात पैसे देऊनही पाषाणकर यांनी फिर्यादी यांना सदनिकेचा ताबा न देता त्यांची फसवणूक केली. आर्थिक नुकसानीतून पाषाणकर बेपत्ता झाले होते. पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करु नये अशी विनंती सरकारी वकील अॅड. राजेश कावेडिया यांनी युक्तीवाद करताना केली.
या प्रकरणात फिर्यादी ठाकोर यांच्या वतीने अॅड. सागर कोठारी, अॅड. नारायण पंडीत यांनी बाजू मांडली. ग्राहकांना विक्री करण्यात आलेल्या सदनिका बँकेकडे तारण ठेऊन कर्ज घेण्यात आले आहे.
याप्रकरणाचा तपास करण्यासाठी पाषाणकर यांना पोलीस कोठडी देण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यानंतर पाषाणकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
