दोघांना केली अटक : पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन परिसरातील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आलेल्या शिवीगाळ करुन धमकावून कारवाईला विरोध करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून काडेपेटीने पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना आंबेगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
कुणाल आनंद साळुंके (वय ३८, रा. साई सावली बंगला, आंबेगाव खुर्द) आणि राम गंगाधर सरोदे (वय २९, रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हेमंत कोळेकर यांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, कोळेकर हे आपल्या सहकार्यांसह आंबेगाव खुर्द येथील जांभुळवाडी रोडवरील आमृतखान परिसरात अनाधिकृत बांधकामावर गुरुवारी दुपारी कारवाई करतील होते. यावेळी कुणाल साळुंके याने जेसीबी ऑपरेटर कांबळे यांना शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिली. साळुंके हे त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन आले. ”कारवाई थांबवा. एखाद्याचा प्रपंच रस्त्यावर आला तर तुम्हाला सोडणार नाही” अशी धमकी देऊन कोळेकर यांना धक्काबुक्की केली. बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार मगदुम यांनी साळुंके याला बाजूला केले असताना त्याने कारवाईत अडथळा आणणे चालूच ठेवले. राम सरोदे हा जेसीबीच्या टपावर चढून आरडाओरडा करुन महानगरपालिका व अधिकारी यांच्या नावाने शिवीगाळ केली. त्याने प्लॅस्टिकच्या बॉटलीमध्ये आणलेले पेट्रोल अंगावर ओतून काडेपेटीने काडी पेटवून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने काडी विझवून सरोदे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे व आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.