आरोग्य विभाग भरती पेपर फुटीप्रकरण : न्यायालयाने ७ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात पोलिसांनी एकाला औरंगाबाद येथून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.1) रोजी करण्यात आली.
विजय प्रल्हाद मुऱ्हाडे (वय 29, रा. नांदी, ता. अंबड, जिल्ह, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फुटलेल्या पेपरच्या स्क्रीन शॉट्समध्ये विजय मुऱ्हाडे याचे नाव होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून त्याचा शोध घेऊन आज त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकारामुळे शासनाची आणि परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक तपास सुरु केला. त्यावेळी आरोपी विजय मुऱ्हाडे याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला औरंगाबाद येथून अटक केली. त्याला अटक केल्यानंतर तो इतर व्यक्तींची नावे सांगत होता. या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु असून आरोपींची साखळी शोधण्यात येत आहे. तसेच हा पेपर आरोपींना कोणी दिला, त्याने ते कोणाकोणाला पाठले, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत असल्याचे हाके यांनी सांगितले.















