चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : बीडमध्ये बिनतारी संदेश विभागात कार्यरत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यस्तरीय खेळाडू असल्याबाबतच्या बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे पोलीस दलात नोकरी मिळवणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावर पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश नवनाथ करांडे (रा. बीड) असे बनावट प्रमाणपत्र तयार करुन नोकरी मिळवणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दिनेश करांडे सध्या बीड येथील बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहे. करांडे यांनी 2015-16 मध्ये पोलीस दलात नोकरी मिळवली होती.
अप्पर पोलिस महासंचालक व संचालक, दळण वळण व परिवहन कार्यालयामार्फत 2015-16 मध्ये रेडिओ यांत्रिकी विभागाची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती प्रक्रिया घेतली होती. या भरतीमध्ये करांडे याने 2012 मध्ये झालेल्या राज्य शुटींग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांक मिळवल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. तसेच, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याकडून खेळताना पहिल्या क्रमांकाचे, 2015 मध्येच त्याने बीड जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांकाचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन सादर केले होते.
करांडे याने बनावट प्रमाणपत्र सादर करुन पोलीस दलात नोकरी मिळवली होती. दरम्यान करांडे याने सादर केलेल्या प्रमाणपत्रासंदर्भात संबंधीत स्पर्धकांच्या आयोजकांकडे चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर विभागीय चौकशीमध्ये करांडे हा दोषी आढळून आला. त्यानंतर त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पवार करत आहेत.
