पुण्यातील विमाननगरमधील घटना : महापालिकेच्या ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे केली होती तक्रार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोणतीही पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे सांगून हेअर ट्रान्सप्लांट करुन फसवणूक करणार्या तोतया डॉक्टराला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.
शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) असे या तोतया डॉक्टराचे नाव आहे. त्याचबरोबर केवळ दहावी पास असताना परिचारिका म्हणून त्याच्या क्लिनिकमध्ये काम करणार्या अन्य दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी महापालिकेच्या ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात असलेल्या डॉ. हेअर मॅजिका हेअर ट्रान्सप्लांट अँड अॅस्थेटिक स्टुडिओ येथे कारवाई करुन डॉक्टरला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शाहरुख शाह याने गेल्या ३ वर्षांपासून हे हेअर ट्रान्सप्लांट क्लिनीक सुरु केले होते. तो हेअर ट्रान्सप्लांटसाठी प्रत्येकाकडून २५ ते ३० हजार रुपये घेत असे. त्याच्याविषयी तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने केवळ बीएस्सी पर्यंत शिक्षण घेतले असल्याची माहिती पुढे आली. त्याच्याकडे हेअर ट्रान्सप्लांट विषयी कोणतीही पदवी नसल्याने आढळून आल्याने महापालिकेने त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याने क्लिनिकमध्ये ठेवलेल्या दोन महिलांना परिचारिकेचे कोणतेही शिक्षण नसताना त्यांच्याकडून परिचारिका म्हणून काम करुन घेतले जात होते. सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर अधिक तपास करीत आहेत.
