कोथरूड पोलिसांत गुन्हा : विरुद्ध दिशेने जात असताना कारला बसली धडक
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मद्यप्राशन करुन भरधाव वेगात विरुद्ध बाजूने बुलेट चालवणे पुण्यातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. बुलेटची धडक समोरून येणाऱ्या कारला बसून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघात पुण्यातील कोथरुड येथील पौड रोडवर २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास झाला.
शिवम राजेंद्र पवार (वय-21 रा. पूर्वा अपार्टमेंट, कोथरुड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शैलेश घाग हा गंभीर जखमी झाला आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मयत शिवम आणि जखमी शैलेश हे दोघे २९ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करण्यासाठी रॉयल इन्फिल्ड दुचाकीवरून जात होते. दुचाकी चुकीच्या दिशेने आणि भरधाव वेगात जात असताना समोर येणाऱ्या चार चाकीवर जाऊन धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शिवम याचा मृत्यू झाला. कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
मात्र पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान रुग्णालयातील कागदपत्रे तपासली.
त्यावळी शिवम पवार याने मद्यपान करुन गाडी चालवल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी मयत शिवम पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.
