भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद :कागदपत्रांत फेरफार करून केला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कर्जदारांसोबत संगनमत करुन कागदपत्रांमध्ये फेरफार करुन फायनान्स कंपनीची २ कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या मॅनेजर विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 नोव्हेंबर 2019 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कात्रज येथील विजेस होल्डिंग्स अँड फायनान्स लि. या कंपनीत घडला आहे.
सचिन तुळशीराम बोरसे (वय-31 रा. शारदा कॅम्प्लेक्स, घुले नगर, मांजरी बु. हडपसर) याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इम्तियाज जैनुलबीन रफाई (वय-36 रा. दापोडी, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या कात्रज येथील विजेस होल्डिंग्स अँड फायनान्स कंपनीत सचिन बोरसे हा मॅनेजर म्हणून काम करत होता. मॅनेजर पदावर काम करत असताना आरोपीने कर्जदारांसोबत संगनमत केले. कर्जदारांच्या बँक खात्याचे स्टेटमेंट बनावट व त्यामध्ये फेरफार करुन ती खरी असल्याचे भासवले. या कागदपत्रांच्या आधारे स्वत:च्या फायद्यासाठी कर्जदारांना कर्ज मंजूर करुन फायनान्स कंपनीची 2 कोटी 16 लाखांची फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर करीत आहेत.
