विमानतळ पोलिसांत गुन्हा : पुण्यातील विमानतळ नीलकमल सक्सेस प्रा.लि.मध्ये घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एंजल ब्रोकिंग अॅपच्या सहाय्याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास 100 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून 34 लाख 82 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्याला जेरबंद केले असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2021 ते 3 डिसेंबर या कालावधीत पुण्यातील विमाननगर येथील नीलकमल सक्सेस प्रा. लि. या ठिकाणी घडला आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी निलेश भालचंद्र जगताप (वय-42 रा. श्रीरामनगर, खेड शिवापुर, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी निलम छोटेलाल केवट (वय-30) ला अटक केली आहे. तर प्रमोद अर्जुन चव्हाण (वय-40 रा. पिंपरी) आणि सचिन चव्हाण (वय-40 रा. पिंपरी) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी संगनमत करुन एंजल ब्रोकिंग अॅपच्या सहाय्याने शेअर मार्केटमधील 100 दिवसांच्या दामदुप्पटीचा प्लॅन सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी फिर्यादी यांना 41 लाख 82 हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. गुंतवलेली रक्कम 100 दिवसांत दामदुप्पट देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. तसेच रोजच्या रोज परतावा फिर्यादी यांच्या बँक खात्यात जमा करण्याची हमी दिली. तसेच शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले तरी गुंतवलेली रक्कम 100 दिवसांत दामदुप्पट देण्याचे आश्वासन आरोपींनी दिले. फिर्यादी यांनी गुंतवलेल्या एकूण रक्कमेपैकी 7 लाख रुपये त्यांना परत करण्यात आले. मात्र, उर्वरीत रक्कम 34 लाख 82 हजार रुपये परत न करता आर्थिक फसवणूक केली.
तक्रारदार यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. पोलिसांनी चौकशी करुन निलम केवटला अटक केली आहे. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.
